मलिन पणे कैसा येऊ तुझ्या मंदिरात..

“एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात..”, गदिमांचं एक अप्रतिम गाणं वसंत पवारांनी अतिशय समर्पक संगीतबद्ध केलं आणि सुधीर फडक्यांनी त्यातल्या प्रत्येक शब्दाला आणि त्याच्या भावार्थाला सुरेखपणे गायनातून व्यक्त केलं! हे संपूर्ण गाणं छानंच आहे पण मला त्यातली ही ओळ प्रत्येकवेळी कातर करुन जाते – “मलिन पणे कैसा येऊ तुझ्या मंदिरात..” ही ओळ गातानाचा बाबूजींचा आर्त स्वर काळजात कालवाकालव करतो!

मी ही ओळ आयुष्य जगताना खूप साऱ्या परिस्थितींबद्दल आजमावून पाहतो. मला असं प्रामाणिकपणे वाटतं की प्रत्येक माणसाने कोणतंही काम करताना स्वतःशी हे नक्की तपासून पहावं

कोणतेही काम, कृती करताना त्याचा आपल्यावर, कुटुंबावर, समाजावर आणि पर्यायाने देशावर होणारा परिणाम दूरगामी असतो आणि याचसाठी मला वाटतं की हे प्रत्येकवेळी, पुनःपुन्हा तपासणं खूप महत्वाचं आहे – “मी स्वतः मलिन होतोय का? आपण क्षणिक स्वार्थासाठी तडजोड करतोय का?”

याची रोजच्या जीवनातली काही उदाहरणं –

१. ट्रॅफिक सिग्नल: आपल्या लहानग्यांना गाडीवरून अथवा गाडीतून घेऊन जाणारे कित्येक पालक काॅर्नरला ट्रॅफिक पोलिस नसतील तर बिनदिक्कत पणे पुढे निघून जातात! त्यांना हे कळतंय का कि हा त्यांचा मलिनपणांच आहे आणि त्यांची हि पुढची पिढी हेच बरोबर आहे असं समजून तेच शिकते.. बघा आपल्या शहरात, आपल्या देशात यामुळे कशी बजबजपुरी झाली आहे 😢

२. आपण कित्येकदा रस्ते अपघाताच्या आणि मालमोटार ऊलटून त्यातला सगळा माल रस्त्यावर सांडल्याच्या बातम्या वाचतो. पण त्याचबरोबर त्या अपघातात अडकलेल्या लोकांना वाचवण्याऎवजी रस्त्यावर पडलेला हा फुकटातला माल आधाश्या सारखा पळवण्यात कित्येक महाभाग पुढे असल्याच्या पण बातम्या वाचतो! काय झालंय आपल्याला?

हाच तो मलिनपणा…!

३. देवदर्शनाच्या रांगेत सुद्धा आपण एकमेकाला फसवत मी स्वतः कसा लवकर पुढे जाईन हे पाहतो! मी स्वतः हे सगळं कोल्हापूर ला देवीच्या दर्शनाच्या रांगेत पाहिलं आणि न राहवून एका माणसाला म्हणालो – देवाकडे जायची एवढी घाई झालिये का तुम्हाला? त्या माणसाला याचा प्रचंड राग आला पण तिथे या ओळी दुर्देवाने अजूनही किती समर्पक आहेत!

असो, अशी अनेक उदाहरणं आहेत आणि त्या बद्दल लिहीत बसलो तर खूप वेळ लागेल..

पण आपण सगळे, आपले मित्र, सहकारी ही सवय स्वतःला काटेकोरपणे लावून घेऊया आणि स्वतःचीच शूचिर्भूतता वेळोवेळी तपासूया..

कोणतेही काम करताना अधूनमधून स्वतःला विचारा – “मलिन पणे कैसा येऊ तुझ्या मंदिरात”

याविषयावर तुमची मते, अभिप्राय आणि अनुभव वाचायला नक्की आवडेल, नक्की कमेंट्स मध्ये कळवा.

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो!

विजय

6 thoughts on “मलिन पणे कैसा येऊ तुझ्या मंदिरात..

  1. फारच छान लिहिले आहेस.
    दुसऱ्यासाठी नाही तर स्वतः साठी प्रामाणिक असायला हवे. 💐💐

    Liked by 2 people

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.