जगदीश खेबुडकरांनी लिहिलेलं हे गाणं माझ्यासाठी जीवनाचं सार आहे!
आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा।
माझे आजोबा – शंकर महारुद्र देशपांडे हे आमच्या मुळगावी – चाफळ ला रहात होते. तिथे त्यांनी अतिशय सचोटीने ४३ वर्षे व्यवसाय केला. ते आपल्या मुलांना जीवनात यशस्वी होण्यासाठी हाच मंत्र सांगायचे.. त्यांनी माझ्या दोन्ही काकांना सांगितले “आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आपलं गाव आणि आपलं घर सोडा, मग तुम्हाला संधी अमर्याद आहेत”.
पुढच्या ओळी हेच सांगतात..
तुजभवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया,
सुखलोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेशी आसरा..
घर कसले ही तर कारा, विषसमान मोती चारा,
मोहाचे बंधन द्वारा, तुज आडवितो हा कैसा उंबरा..
तुज पंख दिले देवाने, कर विहार आनंदाने,
दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडुनिया सरिता सागरा!
आपण लहानपणापासून कित्येक यशस्वी लोकांची चरित्रे वाचतो. त्या सगळ्या लोकांच्या यशात घरातून बाहेर पडून स्वकर्त्वुत्वावर मोकळ्या आकाशात झेप घेऊन यशाला गवसणी घालण्याचा समान दुवा आहे!
काहीवर्षापूर्वी हिंदीमध्ये एक चित्रपट आला होता – रेफ्यूजी. त्या चित्रपटातल्या एका गाण्यात एक ओळ होती – ” जो घरोंको छोड के है चले, उन्हे क्या डरायेंगे फास़ले।”.. किती खरं अाहे! … “डर के आगे जीत है”
सारांश: आपल्या मुलांना छातीला कवटाळून बसू नका, त्यांना धडपडू दे, पडू दे.. पण एकदा त्यांनी झेप घेतली की त्यांना आणी तुम्हाला देखील आकाश ठेंगणं वाटेल!
माझ्या आजी-आजोबांच्या स्म्रुती ला समर्पित!